घाव अजुनी...

शनिवार, ९ जुलै, २०२२

तू वेगळं काय करतोस..!

कोण तू..!
कुठून आलास..!!
कशासाठी !!!
.
तुझ्या येण्याने काय फरक पडला..!
तू नसता आलास तर
काय बंद पडलं असतं... !!
.
आहेस कशासाठी..!
.
तुझ्या असण्याने काय फरक पडतो.. !!
आणि नसण्याने काय बिघडतं.. !!!
.
जाणार कुठे आहेस...!
.
गेल्याने काय फरक पडणारै..!!
आणि न गेल्याने काय बिघडणारै..!!!
.
जन्म घेणं..
जवान होणं..
जन्माला घालणं.., आणि 
ज्याला जन्म दिला त्याला,
जन्म देण्यालायक बनवणं..!
.
संपलं की तुझं तथाकथित इतिकर्तव्य..!!
.
तुला माहित्यीये..?
जगातले असंख्य जीव, जंतू, किडे नि झाडं
हेच इतिकर्तव्य करतात..!!
.
तू वेगळं काय करतोस..!!!
***

सोमवार, १० जानेवारी, २०२२

रेसिपी

पसा दोन पसा

बाजरीचं पीठ ताटात घेऊन

चिमुटभर मीट टाकून

वाटीभर पाण्यात मळून

थापलेली भाकर

तव्यावर अन् मग चुलीतल्या विस्तवावर

खरपूर भाजून घ्यावी.


या रेसिपीचा व्हिडीयो

बनवताना

गरमागरम भाकरीचा 

एक तुकडा तोडून 

तोंडात टाकावा.


कोणत्या इनर्जेन्ट्सचा

कोणता फ्लेवर

जीभेच्या कोणत्या भागावर जाणवतोय

हे सांगायला जाल 

अन् तोंडावर चवीची एक्सप्रेशन्स द्यायला जाल

तर त्रेधातिरपीट उडेल तुमची.


पीठ, मीठ, पाणी अन् अग्नी मिळून

पोटाची आग विझवणे

हा एकच इरादा असतो या रेसिपीचा.


पोटाची आग विझत असतानाचे एक्स्प्रेशन्स

तुम्ही कुठून आणाल?


इनर्जेन्ट्स, मसाले आणि त्यांचे फ्लेवर्स

या सगळ्या गोष्टी तर लागतात

भरल्यापोटी करायच्या 

पदार्थांच्या रेसिपीत...

****

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

मनसोक्त

 तुम्ही

एखादा क्षण, 

एखादा दिवस...

मनसोक्त जगलात 

त्याचा अर्थ काय असतो..

.

अर्रर्र..

आपल्याला अर्थाशी

कुठं काय घेणं देणं आहे..!

.

आपला मूळ मुद्दा हा आहे

कि

आपण खरेखुरे 

मनसोक्त जगत असतो

तेव्हा तेथे फक्त आपणच

असतो..

.

निव्वळ आपण..

सुखैनैव एकटे...!!

.

आपलं.. आपलं..

असं आपण 

ज्या

आईबाप, भाऊ बहिण, मित्र मैत्रिणी, बायका पोरे,

सहकारी शेजारी,

यांना म्हणत असतो..

.

त्यांच्या पैकी

एखाद्याची 

एन्ट्री झाली रे झाली की,

आपल्या मनसोक्तपणाला

मनसोक्त घोडा लागतो..!

.

हा घोडा काबूत ठेवला पाहीजे..

.

तरच 

अधूनमधून जगता येईल..

.

मनसोक्त...!

****









 












मनसोक्त 

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

लक्षात असू द्या..

आजकाल कुत्रे फार भुंकत असतात..
पण तुम्ही घाबरू नका..

सत्ता, संपत्ती अन् जनमत
तुमच्या बाजूने असल्यावर
तुम्हाला
भुंकणाऱ्या कुत्र्यांची चिंताच कशाला..!

पण काही कुत्रे
तुमच्यासाठी घातक ठरू शकतात.. 

कारण त्यांचे भुंकणे 
नियमबध्द अन् सुसंगत असते..

असू द्यात..

भांग मिसळून
चार-दोन बिस्किटे फेकली की
त्यांची लय तुमच्या ताब्यात येते..

पण मग नंतर
हे कुत्रे पुन्हा पुन्हा
बिस्किटे मागू लागतात..

बिस्किटांचा खर्च
जास्त व्हायला लागल्यावर
बिस्किटात द्या थोडंसं जहर मिसळून..!

आता ही कुत्री भुंकायची तर बंद होतीलच...
उलट
जहरावरचा उपाय शोधत शोधत
तुमच्या  पायाशी येतील..

मजबुरीतून तुमचे पाय चाटणाऱ्या कुत्र्यांची 
अशी पोसलेली फौज
हेच तर तुमचं वैभव आहे..

पण
तरीही तरीही तरीही तरीही...

जे कुत्रे तुमच्या
सत्तेला, संपत्तीला, 
बिस्किटांना अन् धमक्यांना
अजिबात जुमानत नाहीत..

ते हडकुळे स्वाभिमानी कुत्रे
एक दिवस
तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय
राहणार नाहीत..
हे कायम लक्षात असू द्या..!!
***